
”कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेने करायची या विचाराचा मी आहे. त्याच विचाराने मी झपाटून काम केले, मात्र त्याच क्षमतेने मी एखादी गोष्ट करू शकत नसेन तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वत:ला मुक्त करणे गरजेच आहे.”
विराट कोहलीने आपल्या आक्रमक स्वभावानुसार शनिवारी तडकाफडकी टीम इंडियाच्या कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले. ट्विटरवर अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट टापून त्याने ही घोषणा केली. ‘प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी अंत असतोच. त्यामुळेच आता हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आली आहे,’ असे कोहलीने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे मागील घडलेल्या काही घडामोडींवरून सहज लक्षात येते. सर्वप्रथम विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी बीसीसीआयने त्याच्याकडील एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर हिंदुस्थानने कसोटी मालिका गमावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार सोडण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सात वर्षांपासून विराट कोहली टीम इंडियाची धुरा सांभाळत होता.
कर्णधारपदाला पूर्णविराम द्यायची वेळ आलीय!
हिंदुस्थानी कसोटी संघाचे कर्णधार सोडण्याचा निर्णय घेताना विराट कोहलीने ट्विटरवरून पुन्हा एकदा भावनिक पोस्ट लिहिली. तो म्हणाला, ‘संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्षे मेहनत घेतली. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, मात्र प्रत्येक गोष्टीला कधीतरी अंत असतोच. त्यामुळेच आता हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. मात्र कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेने करायची या विचाराचा मी आहे. त्याच विचाराने मी झपाटून काम केले, मात्र त्याच क्षमतेने मी एखादी गोष्ट करू शकत नसेन तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वत:ला मुक्त करणे गरजेच आहे. अर्थात असे करणे योग्य नाही याचीही मला जाणीव आहे, मात्र याबाबतीत मी स्वत:ची आणि माझ्या संघाची फसवणूक करू शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी कसोटी संघाचेही कर्णधार सोडण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे,’ असेही कोहलीने म्हटले आहे.
मी बीसीसीआयचा आभारी!
मी बीसीसीआयचे मनःपूर्वक आभार मानतो. कारण त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी भूषणावह बाब होय. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या संघसहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील सर्वांचे योगदान फार मोठे आहे. सर्वात शेवटी मी एम. एस. धोनीचे शतशŠ आभार मानतो. कारण त्याच्यामुळेच मी टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्वगुण दिसल्यामुळे त्याने हिंदुस्थानी संघाला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी माझे नाव सुचवले. त्याचे मनापासून आभार, असे कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
टीम इंडियात दुफळी?
विराट कोहलीने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णदारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्मा टी-20 आणि वन डे संघाचा कर्णधार झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी विराट कोहली काही सामने खळणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आपण खेळणार नाही अशी कोणतीही माहिती मी बीसीसीआयला दिली नाही, असे विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर विराटला रोहितच्या नेतृत्वाखाली खेळायचे नाही आणि रोहितला विराटच्या नेतृत्वाखाली खेळायचे नाही अशा चर्चांना उधाण आले, मात्र असे काही नसल्याचे विराटला पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागले. यावरून टीम इंडियात दुफळी पडल्याचे सहज लक्षात येते. याचबरोबर बीसीसीआय आणि कोहली यांच्यातही सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.




























































