निरामय – कोजागिरी पौर्णिमा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

आज कोजागिरी पौर्णिमा! शरद ऋतूत येणारी ही पौर्णिमा उत्साह आणि सकारात्मक वातावरण घेऊन येते. या ऋतुबदलात मसाला दूध पिऊन आपण शरीराला हिवाळ्यासाठी सज्ज करतो. हे अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक असल्यामुळे प्रत्येकाने आवर्जून याचा आनंद कोजागिरी पौर्णिमेलाच नव्हे, तर इतर वेळेसही घेतला पाहिजे.

मसाला दुधाचे फायदे –

दूध – दूध लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वांसाठीच अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक समजले जाते. यात उपयुक्त कर्बोदके, प्रथिने, पॅल्शियम आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ यांचा समावेश असतो. दुधामुळे मन शांत राहते व झोपही शांत लागते.
साखर – बेताच्या प्रमाणात साखर घातल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

सुका मेवा – काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, बेदाणे इत्यादी मसाला दुधात घातले जाते. यात प्रथिने, पॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक असतात. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात, त्याचबरोबर ऊर्जाही देतात.

वेलची, जायफळ, हळद, केशर – वेलची आणि जायफळ सुगंध देतात आणि केशराचे अनेक आरोग्यदायी गुण दुधात उतरतात. हे सर्व जिन्नस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

इतर वेळेस आपण मसाला दूध मधल्या वेळेत किंवा संध्याकाळी घेऊ शकतो. मुलांसाठी हे दूध खूप उपयुक्त आहे. कोणतेही इतर पेय घेण्यापेक्षा मसाला दूध हे सर्वात आरोग्यदायी आहे.

मसाला दूध : साहित्य – 1 लि. दूध, काजू, बदामाची भरड पूड, पिस्त्याचे काप, वेलची पूड, जायफळ पूड, केशर दुधात भिजवलेले, पाव चमचा हळद, चारोळ्या, बेदाणे, साखर (चवीनुसार).

कृती –

1 लि. दूध पातेल्यात उकळवून घ्यावे आणि थोडे दाट होईपर्यंत उकळू द्यावे. मग त्यात काजू, बदाम पूड, वेलची, जायफळ पूड, बेदाणे, चारोळ्या, हळद, केशर हे सर्व घालून मंद उकळवावे. चवीनुसार साखर घालून पिस्त्याचे काप आणि चारोळ्यांनी सजवून गरम मसाला दुधाचा आनंद घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या