ब्रेनडेड झाला, पाचजणांना जीवनदान दिले! माणगावच्या महेशला सॅल्यूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघातात ब्रेनडेड झालेल्या रायगड जिह्यातील माणगाव येथील महेश ऊर्फ बंटीचे त्याच्या कुटुंबियांनी अवयवदान केले. महेश ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्याचे फार काळ दुःख करत न बसता महेशच्या वडिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने शनिवारी तत्काळ त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तब्बल चार-पाच तास मेहनत घेत अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे किडनी, यकृत आणि हृदयाची अवश्यकता असलेल्या पाच गरजू रुग्णांना जिवदान मिळाले आहे. जे.जे. रुग्णालयातील ही तिसरी अवयवदान प्रक्रिया ठरली आहे.

माणगाव येथे सर्व्हिस सेंटर चालवणाऱया महेश येरुणकर (25) या तरुणाचा गुरुवारी रात्री दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यानुसार डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. या वेळी महेश ब्रेनडेड झाला असल्याचे सर्जरी विभागाचे डॉ. गिरीश बक्षी यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पाच डॉक्टरांच्या टीमने त्याची तपासणी करून तो ब्रेनडेड असल्याची खात्री केली. तसेच त्याच्या कुटुंबियांना अवयवदानाबाबत सामुपदेशन केले. तरुण मुलगा गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही महेशचे वडील विजय येरुणकर यांनी त्यातून सावरत अवयवदानास सहमती दर्शवल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस झेडटीसीसीचे डॉ. माथूर, जे.जे.चे असोसिएट अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.

सुट्टी असूनही जे.जे.त युद्धपातळीवर काम

महेशचे अवयवदान करण्यास त्याच्या वडिलांनी सहमती दिल्यानंतर शनिवार सुट्टीचा दिवस असतानाही सर्जरी, न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, मेडिसीन, ऍनॅस्थेसिया, युरॉलॉजी, कार्डिओलॉजी, फॉरेन्सिक, प्रयोगशाळा या सर्व विभागातील डॉक्टर, कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर काम करून अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर युरोलॉजी विभागाचे डॉ. वेंकट गीते यांनी महेशच्या एका किडनीचे प्रत्यारोपण जे.जे. रुग्णालयातील एका रुग्णावर केले. दुसरी किडनी वोक्हार्ट रुग्णालय येथे पाठवली तर हृदय जसलोक रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले. तसेच यकृताचा काही भाग अपोलो तर काही भाग ज्युपिटर रुग्णालय येथे पाठवण्यात आल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.