कोकण योध्दा सागर मोहीम प्रारंभ, साठ छात्रसैनिक घेणार दर्यावर्दी जीवनाचा साहसी अनुभव 

595

एनसीसीच्या कोल्हापूर ग्रुप अंतर्गत असणाऱ्या 2 महाराष्ट्र नेव्हल बटालियनच्या 10 दिवसीय कोकण योध्दा सागर मोहिमेचा शुभांरभ आज भगवती बंदर येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 60 छात्रसैनिक सुमद्राच्या लाटांशी झुंज देत शिडाच्या नौकेतून दर्यावर्दी जीवनाचा साहसी अनुभव घेताना किनारपट्टीवरील लोकवस्तीत पथनाट्यातून सामाजिक प्रबोधन करणार आहेत.

यावेळी कोल्हापूर एनसीसी ग्रुप कमांडर आर.बी. डोगरा, संचालक सुनील बालाकृष्णन तसेच बटालियन आणि मोहिमेचे प्रमुख असलेले कमांडर अलोक लांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयुष्यात कठीण मार्ग निवडल्यास अधिक यश प्राप्त होते कारण अशा स्थितीत शिस्त आणि मेहनत अधिक करावी लागते असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. एनसीसीमध्ये मी होतो. इथं शिस्त आणि एकता शिकवली जाते. आजच्या देशातील स्थितीत याची अधिक आवश्यकता आहे असे ते म्हणाले. आज 15 जानेवारी  आर्मी डे आहे याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या मोहिमेत प्रथम नाविक दलासोबत आर्मी आणि हवाई दलाच्या कॅडेटचा समावेश करण्यात आला आहे. 10 दिवसांच्या या मोहिमेत तीन दलाच्या एनसीसी बटालियनचे 35 मुले व 25 मुली असे 60 जण सहभागी होत आहेत. ग्रुप कमांडर म्हणून कोल्हापूर ग्रुप मध्ये माझ्या काळात मी सिंधुदूर्ग मध्ये दुसरे एनसीसी युनीट सुरु करु शकलो याचा मला आंनद आहे असे आर.बी. डोगरा यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले.  51 वर्षांनतर असे युनीट या ग्रुप मध्ये सुरु झाले आहे. यामुळे आता कॅडेटसची संख्या 6 हजार पर्यंत वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या