
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात संगमरवरी फरशी काढण्यासाठी सुरू केलेल्या संवर्धन प्रक्रियेत संस्कृत भाषा व देवनागरी लिपीतील सोळा ओळींचा गद्धेगाळी शिलालेख उजेडात आला आहे. सदरचा शिलालेख हा इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख असल्याचा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे.
मूळ हेमाडपंती स्थापत्य शास्त्रानुसार बांधकाम असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्यात एका स्थानिक भाविकाच्या इच्छेनुसार संगमरवरी फरशी बसविण्यात आली होती. मंदिरातील तापमानाचा समतोल राखण्यासाठी तज्ञांच्या अहवालानंतर गेल्या काही महिन्यांपासून या फरशी काढण्यात येत आहेत. त्यामुळे मंदिराचे अंतरंग उलगडत असतानाच तापमानातही बराच फरक पडल्याचे दिसून येत आहे. पुरातत्व खात्याच्या सूचनेनुसार उर्वरित संगमरवरी फरशी काढण्यात येत आहे.
श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यालगत असलेल्या श्री सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत साधारण दोन फूट लांब व एक फूट रुंद आणि आडवा असलेला हा शिलालेख उजेडात आला आहे.
मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीसाठी वापर केल्याचे दिसून येते. यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील इतिहासात आणखीन एक मौल्यवान भर पडली आहे.
यासंदर्भात लवकरच माहिती देणार
– या शिलालेखातील ओळींसंदर्भात संबंधित तज्ञांकडून अभ्यास व भाषांतर करून लवकरच यांची माहिती देण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्याकडून सांगण्यात आले.



























































