
जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनवेळेत आता बदल करण्यात आला आहे. शासननिर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ई-पास, अभिषेक बंद करण्यात आले असून, सोशल डिस्टन्ससह सॅनिटाझजर हाताला लावून दर्शनाला सोडले जाणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पुजारी प्रतिनिधी माधव मुनीश्वर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्चपासून श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
दोन महिन्यांपूर्वी भाविकांना दर्शनासाठी काही नियमावली घालून मंदिर खुले करण्यात आले होते. त्यानंतर दर्शनाची सकाळी 6 ते रात्री 8 अशी वेळ होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग पाहता, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने खबरदारी म्हणून दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार 25 फेब्रुवारीपासून सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.
दुपारी 12 ते 3 या वेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार आहे. याशिवाय मंदिरात भाविकांकरवी करण्यात येणारे अभिषेक यांसारखे धार्मिक विधी, भाविकांसाठी केलेली ई-पासची सुविधादेखील बंद करण्यात आली आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम दरवाजांतून दर्शन सुरू राहणार आहे. पूर्व दरवाजाकडील मंडप, तसेच मुखदर्शनासाठी येणाऱ्य़ा भाविकांना रांगेत सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक मार्किंग करण्यात येणार आहे.
फोटो काढल्यास मोबाईल, कॅमेरा जप्त होणार
मंदिरात येताना मास्क, सॅनिटायझर व भाविकांची तापमान तपासणी सुरू आहे. मंदिरात विनामास्क आढळल्यास 200 रुपये दंड करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात भाविकांना जास्त वेळ थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारे छायाचित्र, व्हिडीओ, सेल्फी काढल्यास मोबाईल, कॅमेरे जप्त करून 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


























































