
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज आज झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत, तर 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली. 28 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज वैध झालेल्यांमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस), सत्यजित कदम (भाजप), यशवंत शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड), विजय केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहीद शेख (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह अस्लम सय्यद, सुभाष देसाई, बाजीराव नाईक, भारत भोसले, मनीषा कारंडे, अरविंद माने, मुस्ताक मुल्ला, करुणा मुंडे, राजेश उर्फ बळवंत नाईक, राजेश कांबळे, संजय मागाडे व संतोष बिसुरे (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.



























































