
भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते ही निवडणूक मूळ विषयापासून भरकटवीत आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या अवमानास्पद विधानावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दगडफेकीचा हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
सतेज पाटील म्हणाले, ‘भाजपच्या सर्व सभा लाइव्ह सुरू असताना, ही एवढी एकच सभा चित्रीकरणाविना कशी झाली? तरीसुद्धा त्या दगडफेक करणाऱयांचा शोध घेऊन वस्तुस्थिती समोर आणण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना देण्यात आली आहे. काही संशयितांची नावेही पोलिसांना देण्यात आली असून, दगडफेक केल्यानंतर ते संशयित पंपावर की कदमवाडीत गेले, याची चौकशी पोलिसांनी करावी,’ असेही ते म्हणाले.
‘धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या अवमानास्पद वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना ‘घरचा आहेर’ दिला होता. तरीसुद्धा महाडिकांनी महिलावर्गाची दिलगिरी व्यक्त न करता, आपल्या मुद्दय़ावर ते ठाम राहिले. त्यामुळे चित्रा वाघ तरी आपल्या मूळ मुद्दय़ावर ठाम आहेत काय?’ असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
आम्ही घेतो का तुमच्या बायकांची नावे
‘कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीशी माझ्या पतीचा काहीही संबंध नाही. आम्ही घेतो का तुमच्या बायकांची नावं? हिंमत असेल, तर माझ्या पतीची एकतरी भानगड बाहेर काढून दाखवा; मी तुमच्या शंभर भानगडी बाहेर काढते,’ असे आव्हान भाजपच्या चित्रा वाघ यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना दिले आहे.
गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘नाशिकच्या वाघांच्या भानगडी बाहेर काढाव्या लागतील,’ असा इशारा दिला होता. यावर कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना दिलेल्या ‘ईडी’च्या धमकीवरूनही त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगून काढता पाय घेणे पसंत केले.



























































