गाडीच्या छतात बनवला होता चोरकप्पा, 23 लाखांची बनावटी विदेशी दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनाच्या छताच्या खाली खास बनविण्यात आलेल्या चोर कप्प्यातुन 23 लाखांचा विदेशी बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क, भुदरगड पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत हस्तगत करण्यात आला. या मद्यसाठ्यासह वाहतुक करणारे वाहन असा एकुण 32 लाख 8 हजार 760 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, वाहनचालक हरिश केशव गौडा (29, रा.कासुर, गौड, ता.होनावरा, जि.कारवार) याला ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यानुसार पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर बस स्थानक चौकात सापळा लावला. रात्री पावणे दहाच्या सुमारास आलेल्या संबंधित माल वाहतूक कॅन्टर (केए-25-सी-0701) वाहनाची तपासणी केली असता,प्रथमदर्शी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसून आले.

खात्रीशीर माहिती असल्याने कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली असता, हौद्यात वरती छताखाली असलेल्या पत्र्याच्या प्लेटांमध्ये असलेल्या चोर कप्प्यात विविध ब्रॅंन्डचे गोवा बनावटीचे विदेशी मद्यांच्या बाटल्यांचे 361 बॉक्स आढळले. बाजार भावानुसार त्याची किंमत 23 लाख 3 हजार 760 एवढी आहे.