राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल तरच छत्रपती शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक सत्यात उतरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शीतल धनवडे

सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे श्री शाहू छत्रपती मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम तीन महिन्यांत सुरू करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. मात्र, सर्वप्रथम या मिलसंदर्भातील 1200 कोटी कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. विशेष म्हणजे मिलची जमीन खासगी नसल्याने काम सुरू करण्यात अडथळा नाही. आता फक्त शासनाची इच्छाशक्ती असेल, तरच छत्रपती शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक सत्यात उतरणार आहे. दरम्यान, छत्रपती शाहूंचे केवळ पुतळे साकारण्याऐवजी त्यांचे कार्य आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून जिवंत स्मारक करावे, अशी शाहूप्रेमींची अपेक्षा आहे.

आपल्या संस्थानची प्रत्येक क्षेत्रात भरभराट करताना छत्रपती शाहू महाराजांनी सन 1906 मध्ये श्री शाहू छत्रपती मिल सुरू केली. इंग्लंडमधील अत्याधुनिक स्पिनिंग यंत्रणा आणून करवीरनगरीची वाटचाल प्रगतीकडे नेली. पण, कालांतराने ही मिल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अंतर्गत आल्यानंतर तोटय़ात आली. परिणामी राज्यातील एकूण नऊ मिल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील 6 युनिटमध्ये समावेश असलेल्या श्री शाहू छत्रपती मिल व राज्यातील इतर पाच मिलचा एकत्रित ताळेबंद काढण्यात येत असे. या सर्व युनिटचा तोटा 1200 कोटींच्या घरात गेल्याने 31 ऑगस्ट 2003 रोजी हे युनिट बंद करण्यात आले. आता या तोटय़ातील कर्ज व इतर विभागांची थकबाकी शासनाला वर्ग वा वजा करावी लागणार आहे. ते शासनाला शक्य आहे. शिवाय मिलची जागा स्वतः शासनाच्या मालकीकडे असल्याने खासगी मालकाच्या अडथळ्यांचा प्रश्नच नाही.

सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम श्री शाहू छत्रपती मिल येथे छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली. पुढे आराखडा तयार झाला, पण त्याला मंजुरी मिळाली नाही. गेल्या वर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त महाविकास आघाडीकडून या स्मारकाच्या आराखडय़ासाठी नेमलेल्या समितीकडून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेतून पुण्याचे शारंग जोशी आणि श्रीकांत अनवट यांचा आराखडा निश्चित केला. गेल्या वर्षी स्मृतिदिनी शाहू मिलमध्ये त्याचे सादरीकरण होऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, सत्ता बदलाच्या संघर्षात हे काम ठप्प झाले होते. आता छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती शताब्दी सांगता वर्षादिनी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन महिन्यांत या स्मारकाचे काम सुरू करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीच या मिलच्या थकबाकीकडे लक्ष वेधले.

मिलमधील स्मारक उभारणीचा खर्च अडीच पटीने वाढला

कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक शाहू स्मारक येथे भेट दिल्याशिवाय जाणार नाही, अशा पद्धतीचा महानगरपालिकेकडून आराखडा तयार केला आहे. यासाठी श्री शाहू छत्रपती मिलची एकूण 27 एकर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. सुरुवातीस या आराखडय़ाचा खर्च 160 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी थेट 400 कोटींवर गेला. वर्षभरात यामध्ये 10 कोटींची वाढ झाली. प्रत्यक्ष काम सुरू होईल, तेव्हा आणखी रक्कम वाढणार आहे. नियोजित स्मारकास तीन प्रवेशद्वार असून, छत्रपती शाहू महाराजांचा 51 फुटी भव्य पूर्णाकृती पुतळा, 1200 सीट क्षमतेचे खुले नाट्यगृह, कलादालन, 7 हजार 100 सीट क्षमतेचे दृकश्राव्य थिएटर, भूमिगत भव्य पार्किंग, शिक्षण आदी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण कार्यावर भर देण्यात येणार आहे.