कोल्हापूर -दोन महिन्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्या 100 च्या आत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने आढळणा-या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होऊ लागली आहे. आज प्रथमच नव्या कोरोना बाधीतांची संख्या शंभरच्या आत आली. गेल्या चोवीस तासांत ७३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या ४६ हजार ८८१ वर पोहोचली आहे.

चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या ३८३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ४१ हजार १५४ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय गेल्या चोवीस तासांत ८ जणांचा व आतापर्यंत १ हजार ५५८ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.‌ सध्या एकूण ४ हजार १६९ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

दरम्यान कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-२३, इंचलकरंजीसह इतर नगरपालिका क्षेत्रात-५ तर करवीर-७ आणि हातकणंगले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ८ असे नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले.