ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यावर भर द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यावर भर द्या. तसेच, लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण शुक्रवारपर्यंत होण्याची जबाबदारी त्या-त्या विभाग प्रमुखांवर राहील अशा स्पष्ट सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात पूर्वतयारी म्हणून सतर्क राहावे लागेल. उपलब्ध साधनसामुग्री यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. ती सुस्थितीत ठेवण्याबाबत नियंत्रण करावे. प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तयारी ठेवावी. पुन्हा एकदा सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यावरही भर हवा. प्रमुख खासगी लॅबवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या फ्रंटलाईन वर्कर्सचे शुक्रवारपर्यंत शंभर टक्के लसीकरण व्हायला हवे. त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर राहील. लसीकरण न घेणाऱ्यांच्या नावासह खुलासा विभागप्रमुखांनी सादर करावा, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.