
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महीन्यांपासुन बंद असणारे कुस्तीचे आखाडे शासनाच्या नियमा- नुसार सुरू होऊ लागले आहेत.शहरातील नावाजलेल्या तालीमही कुस्तीगिरांना सरावासाठी खुल्या होऊ लागल्या आहेत.त्यामुळे पैलवानांच्या दैनंदिन कसरतीमुळे लाल माती आता पुन्हा घामाने भिजू लागली आहे.वस्तादांच्या सुचनांचा आणि पैलवानांच्या शड्डुचे आवाज घुमू लागले आहेत.
लाॅकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुस्ती पंढरी करवीर नगरीतील सर्वच तालीम बंद ठेवाव्या लागल्या होत्या.आता आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर या तालमी शासनाच्या नियमानुसार पुन्हा सुरू होत आहेत.सरावासाठी जिल्ह्याबाहेरील सर्वच वयोगटातील पैलवान आपापल्या तालमीत दाखल होत आहेत.या आठवड्यापासूनच शहरातील तालमी एक एक करून सुरू होत आहेत.शहरात सध्या पंचगंगा, रंकाळा, गंगावेश, शाहुपुरी, राजारामपुरी परिसरातील नामांकित तालमीत पैलवानांच्या शड्डुचे आवाज घुमू लागले आहेत.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षी छत्रपती शाहू कालीन मोतीबाग तालीम आज शनिवार पहाटे 6 वाजता हनुमानाच्या मूर्ती व शास्त्रोक्त पद्धतीने आखाडा पूजन करून सुरू करण्यात आली. तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पोवार, निलेश देसाई, अशोक माने, वस्ताद पै.उत्तम चव्हाण, पै.रामा कोवाड,पै.विजय पाटील,बाबुराव चव्हाण,वस्ताद दादू चौगुले जुनियर कुस्ती कोच सुहेल आदींच्या प्रमुख उपस्थितीत या तालमीत पुन्हा एकदा कुस्त्या सुरू झाल्या.गेल्या आठ महिन्यापासून तालमीतील दबलेल्या तांबड्या मातीचे पैलवानाने उत्खनन करून, जोर-बैठकांची कसरत करत,कुस्ती पकडीचाही सराव केला. पैलवानांसाठी शासन नियमावलीचे पालन करून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात सराव घेतला जाणार आहे.

































































