जिल्हा मध्यवर्ती बँकेने भरून काढला 103 कोटींचा संचित तोटा, ढोबळ नफा 135 कोटींपर्यंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संचालकासाठी ना गाडयांचा वापर,ना जेवणावळी,चहापान खर्च, परदेश दौऱ्यालाही ब्रेक,मिटिंगचा ना भत्ता, अनाठायी खर्चाला फाटा. चालकांच्या या काटकसरीच्या कारभारास व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाची लाभलेली साथ. या बळावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढला. तर सहा वर्षात बँकेचा ढोबळ नफा 135 कोटीपर्यत पोहचला. सभासद शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे सारे शक्य झाल्याचा यशस्वी मंत्र आज राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सभासदांसमोर व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सांस्कृतिक मंदिर येथे अवघ्या तासाभरात व खेळीमेळीत झाली. याप्रसंगी मुश्रीफ यांनी सभासद,शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची महत्वाची घोषणा केली. शिवाय बँकेचे संचालक व आमदार पी.एन. पाटील यांच्या सुचनेनुसार पुढील वर्षापासून पाच लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज विनाव्याज देण्याची घोषणाही मुश्रीफ यांनी यावेळी केली.

‘ सहा वर्षापूर्वी प्रशासक राजवटीचा काळाकुट्ट डाग सध्याच्या संचालक मंडळाने मे 2015 मध्ये कार्यभार स्वीकारुन,पहिल्याच बैठकीत धूवून पुन्हा एकदा जिल्हा बँकेची प्रतिमा उजळविण्या -चा संकल्प केला.कार्यभार स्वीकारला तेव्हा बँकेचा संचित तोटा 103 कोटीपेक्षा जास्त होता. एनपीए 8.16 आणि व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण 2.89 टक्के होते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सीआरएआरचे प्रमाण नऊ टक्क्यापेक्षा कमी होते.ते अधिक करण्याची मोठी आव्हाने समोर होती.’अशा शब्दांत मुश्रीफ यांनी सहा वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला.त्यानुसार बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण स्विकारले.बँकेच्या गाडयांचा वापर टाळला.भत्ता-चहापान खर्च-परदेश दौरा-सत्कार समारंभ अशा सगळया अनावश्यक गोष्टीला फाटा दिल्याने,कोट्यवधी रुपयांची बचत झाली.शिवाय थकबाकी वसुलीस संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन थकबाकीदारांच्या दारात ‘ढोल-ताशा बजाओ’ आंदोलन केले.त्यातुन दोन वर्षात 103 कोटी रुपयांचा संचित तोटा घालवून बँक नफ्यात आल्याने,लाभांश देण्यास सुरुवात केल्याचेही मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिले.

* राज्यात लौकिक

सन ‘2017-18 मध्ये 43कोटी 98 लाख रुपयांचा नफा मिळवून जिल्हा बँकेने राज्यात प्रथम क्रमांकाचा नावलौकिक मिळवला.शिवाय गेल्या तीन वर्षात अनुक्रमे 11,18 आणि 20 कोटी रुपये इनकम टॅक्स भरल्याचे सांगताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने,सर्वच बँकांना लाभांश वाटपास स्थगिती दिली आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने बारा टक्के पर्यंत लाभांश देण्यापर्यत मजल गेली आहे. लाभांश वाटपाचे 19 कोटी रुपये जमा आहेत. आरबीआयची मान्यता मिळाली की लाभांश वाटप करू असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.