
>>संतोष नाईक, गडहिंग्लज
कोल्हापुरातील गडहिंग्लज शहराला लागूनच असलेल्या बड्याचीवाडी या गावातील शेतवडीत राहणाऱ्या 15 कुटुंबांना रस्त्याअभावी पावसाळ्यात मोठे हाल सोसावे लागत आहे. विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखल तुडवत तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मुख्य रस्ता गाठावा लागतो. वयोवृद्ध रुग्णांची तर मोठी हेळसांड होते. गडहिंग्लज शहराला जोडलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत एखाद्या बैलगाडीतून ओढत किंवा पाठीवरून वाहून रुग्णाला आणावे लागते. या वसाहतीतील वृद्धे महिले उपचारासाठी बैलगाडीतून ओढत आणल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर येथील परिस्थिती सर्वांसमोर आली.
बड्याचीवाडी हे गाव गडहिंग्लज शहराला लागूनच आहे. या ठिकाणी या गावच्या पश्चिमेकडे खोरी वसाहत आहे. या वसाहतीत जवळपास दहा ते पंधरा कुटुंबे वास्तव्यास आहेत. या वसाहतीकडे जाण्या येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात येथील रहिवाशांची मोठी अडचण होत आहे. या वसाहतीतून बड्याचीवाडी गावात व गडहिंग्लज शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना तर गुडघाभर चिखलातून वाट काढत शाळा गाठावी लागते. वयोवृद्ध रुग्ण व गरोदर मातांचे तर मोठे हाल होतात. गडहिंग्लजला दवाखान्याला नेण्यासाठी एखाद्या बैलगाडीत बसून हाताने ओढत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. कधी कधी पाठीवरून देखील वाहून आणण्याची वेळ येथील नागरिकांवर येते. रस्त्याअभावी नाईलाज म्हणून गरोदर मातांना प्रसूतीसाठी आपल्या माहेरी पाठवावे लागते.
काल याच वसाहतीतच राहणाऱ्या सुंदराबाई दळवी या 95 वर्षीय वृद्धेला अस्वस्थ वाटत होते. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लजला आणण्यासाठी चिखल व पाण्यातून वाट काढत बैलगाडी ओढत एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर येथील रहिवाशांचे पावसाळ्यात होणारे हाल समोर आले आहेत. काल या वृद्ध महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले