कोल्हापुरात गणेश आगमनप्रसंगी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन, 354 मंडळांसह साऊंड सिस्टिम चालकांवर गुन्हे

‘एक गाव एक गणपती’सह पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या पुरोगामी कोल्हापूरचे वातावरण सध्या धांगडधिंगाणा घालणाऱ्या व त्याला खतपाणी घालणाऱ्या अपप्रवृत्तींच्या शिरकावामुळे कमालीचे बिघडले आहे. गणेश आगमनप्रसंगी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या जिह्यातील 354 मंडळ आणि साऊंड सिस्टिम चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पैशाचा अपव्यय व इतर वाद टाळण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ साजरा करून कोल्हापूरकरांनी गणेशोत्सवातील पैशाचा उपयोग गावातील इतर विकासकामांसाठी करण्याचा आदर्श इतर जिह्यांना घालून दिला. पाठोपाठ नदी प्रदूषणमुक्तीसह निर्माल्य दान आणि साऊंड सिस्टिममुक्त असासुद्धा गणेशोत्सव करून कोल्हापूरकरांनी आदर्श घालून दिला; पण सध्या या पुरोगामी विचारांना मूठमाती दिल्याचे दुर्दैवाने पाहावयास मिळत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या. साऊंड सिस्टिमच्या आवाज मर्यादेची स्पष्ट कल्पना देण्यात आली. डोळ्यांना घातक अशा प्रखर विद्युतझोत लेझर लाईट वापरण्यास जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली. पोलिसांनी सातत्याने गणेश मंडळांच्या बैठका घेऊन सूचना देऊनही यंदा साऊंड सिस्टिमचा अतिरेक झाला.

गेल्या वर्षी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेकांची करिअर धोक्यात आली असतानाही यंदा गणेशोत्सवाच्या आगमनप्रसंगी याचे कसलेही भान तरुणाईला नसल्याचे दिसून आले. ‘आवाज वाढणार, काचा फोडणार’, असे पोलिसांनाच थेट आव्हान देणारे फलक बिनधास्त झळकावणाऱ्या मंडळांची मजल पाहाता, यंदा गणेशोत्सवात ‘श्रीं’च्या आगमन मिरवणुकीने पुन्हा एकदा कोल्हापूर मागे पडले.

गणेश आगमन मिरवणुकीत राजारामपुरीसह शहरात साऊंड सिस्टिमचा दणदणाट अनुभवायला मिळाला. पोलिसांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे नमुने घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरातील चारही पोलीस ठाण्यांकडून घेण्यात आलेल्या या नमुन्यात 327 मंडळांनी नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ते न्यायालयात पाठवण्याची तयारी सुरू केली. इचलकरंजीत 27 मंडळांवर कारवाई करण्यात आली. दोन्ही मिळून 354 मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी तसेच साऊंड सिस्टिम चालक, मालक, ट्रक्टर मालक आदींवर पोलिसांनी कारवाई केली. इचलकरंजीमध्ये शहापूर पोलीस ठाणे 10, शिवाजीनगर पोलीस ठाणे 12 आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. या गुह्यांमध्ये पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

गणेशोत्सवात प्रेशर मिड व सीओटू गॅस वापरास बंदी

n जिह्यातील विविध गणेश मंडळांकडून मोठय़ा प्रमाणावर मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये काही मंडळांकडून प्रेशर मिड व सीओटू गॅसचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत आहे.विशेषतः मानवी श्वसन संस्थेला हानी, हृदय, कान व डोळ्यांवर दुष्परिणाम, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिह्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रेशर मिड व सीओटू गॅस वापरास सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

आवाज सोडतो..काचा फोडतो.. फलकाचा उतरविला माज

n राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणुकीत ‘आवाज सोडतो…काचा फोडतो..’ असे पोलिसांनाच आव्हान देणारे फलक घेऊन राजारामपुरी बाराव्या गल्लीतील गणेश तरुण मंडळ सहभागी झाले होते.प्रसारमाध्यमांतून याकडे लक्ष वेधण्यात आल्याने अखेर पोलिसांकडून या मंडळाला सज्जड समज देण्यात आली. याप्रकरणी मंडळाचा अध्यक्ष सोहम प्रताप पाटील याने दिलगिरी व्यक्त केली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.