
धुव्वाधार पावसाचा जोर आज किंचित ओसरल्याने दुपारपर्यंत 25.1 फुटांवर असलेली पंचगंगेच्या पाणीपातळीत दोन इंचाचीच घट झाली होती. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी अजूनही पात्रालगतच आहे. आतापर्यंत 27 बंधारे पाण्याखाली गेले असून, एक राज्य मार्ग आणि एक प्रमुख जिल्हा मार्ग असे दोन वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिह्यात धुव्वाधार पावसाने जनजीवन विस्कळित केले आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळीत 12 ते 15 फुटांची वाढ झाली होती. आज दुपारी दोनपर्यंत राजाराम बंधाऱयावर ही पातळी 25.1 फुटांवर स्थिरावली होती. सायंकाळी यामध्ये दोन इंचाची घट झाली होती. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांची पातळी रात्री उशिरापर्यंत ‘जैसै थे’ होती. जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 87.50 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस पडला.
राधानगरीतून विसर्ग सुरू
राधानगरी धरणात सध्या 67.03 दलघमी पाणीसाठा असून, आज सकाळी धरणाच्या विद्युत 850 व सिंचन विमोचकातून 1 हजार 58 असा एकूण 1 हजार 908 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील 2 एसटी मार्ग बंद
पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्य मार्ग व 1 प्रमुख जिल्हा मार्ग असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱयांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील वळण उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून, आंबेवाडी-चिखलीमार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. तर कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱयावर 2 फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे.





























































