
कागल-राधानगरी प्रांत कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास 1 लाख 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आज ताब्यात घेतले. सागर आनंद शिरगांवकर (38, रा.रा. 873, सीवॉर्ड, रविवार पेठ, कोल्हापूर) असे या लिपिकाचे नांव आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने विक्री केलेल्या प्लॉटचा खरेदी-विक्री व्यवहार शासनाच्या तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याप्रमाणे प्रांताधिकारी यांच्याकडून नियमित करून,तसा आदेश देण्यासाठी सागर शिरगावकर याने 1 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन काल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली होती.
यानंतर सापळा रचून ही लाच स्वीकारल्यानंतर शिरगावकर याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पो.नि. जितेंद्र पाटील, सहा.फौजदार शाम बुचडे, पोकॉ मयूर देसाई, रुपेश माने व संदीप पडवळ यांच्या पथकाने हि कारवाई केली.