
दोन कैद्यांनी एका कैद्याला चक्क खिळ्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना कोल्हापूरातील कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात घडल्याचे समोर आली आहे.यामध्ये मकरंद उर्फ मारुती बाबासो मोटे (46,धंदा शेती, रा.धनग,ता.खंडाळा,जि.सातारा) हा कैदी जखमी झाला असुन त्याच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेहुल संदीप पाटील व पिराजी विजयकुमार गरुड अशी मारहाण करणाऱ्या या दोन कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे तिन्ही कैदी खुन प्रकरणातील असुन, यापुर्वी मकरंद याने कारागृह बाहेर असताना या दोन कैद्यांच्या नातेवाईकाला मारहाण केली होती. या पुर्ववैमन्यसातुन आज कळंबा कारागृहात ही मारामारीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कळंबा कारागृहात बराक नंबर 5 आणि 3 अशा दोन वेगवेगळ्या बॅरेकमध्ये शिक्षा भोगत आहेत. आज सकाळी आठच्या सुमारास मकरंद मोटे याला या दोघांनी व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांक दाखवतो असा बहाना करून दोन्ही बराकीच्या मधील जिन्याजवळ बोलवून घेऊन लोखंडी खिळ्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.