
छत्रपती शिवाजी महाराजांसह महामानवांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपालपदावरुन तत्काळ हकालपट्टी करा, या मागणीसाठी रविवारी कोल्हापूर येथील मर्दानी खेळाडूंनी कोश्यारी यांच्या प्रतिमेवर दांडपट्ट्याने लिंबू उडवून आंदोलन केले. शिवभक्त लोकआंदोलन समिती आणि कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा, लाठी असोसिएशनच्या मर्दानी खेळाडूंनी हे अनोखं लिंबुमार आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि कोश्यारींच्या धिक्काराच्या घोषणा देत, शिवाजी पेठेतील सरदार तालीम येथून या खेळाडूंचे पथक मोर्चा घेऊन निघाले असता, त्यांना कोल्हापूरकरांनी सहभागी होऊन, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवृत्ती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पारंपरिक शिवकालीन युद्धनीतीने रस्त्यावर ठेवलेल्या कोश्यारी यांच्या प्रतिमेवरील लिंबू दांडपट्ट्यांने उडवून आंदोलन करण्यात आले.
सहा वर्षाच्या योगेश गुंजेकर व 72 वर्षांचे बाळासाहेब शिकलगार यांच्यासह गौरव डोंगरे, राजेश पाटील, अभिषेक पाटील, पूर्वा पाटील यांनी लिंबू कापून कोश्यारी यांचा निषेध केला. कोल्हापूर जिल्हा दांड पट्टा असो.चे वस्ताद पंडितराव पोवार, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंत मुळीक, बबन रानगे, शंकर शेळके, श्रीकांत भोसले, नाना सावंत, विनोद साळोखे, सूरज ढोली, अमोल बुचडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.























































