
कोल्हापूर महापालिकेच्या चार सदस्य असलेल्या प्रभागरचनेवर शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 55 हरकती आल्या आहेत. यामध्ये प्रभागांची हद्द, पूर्वीचे प्रभागांचे विभाजन न होणे, ठिकाणांच्या नावांमधील बदल तसेच बहुसदस्य प्रभागरचनेवर आक्षेप आदी हरकतींचा समावेश आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱयांकडून नियुक्त केलेल्या अधिकाऱयाकडून या हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
दि. 23 ते 25 सप्टेंबरपर्यंत या हरकतीवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे 9 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचना दि. 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या रचनेनुसार एकूण वीस प्रभागातून 81 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये 1 ते 19 प्रभाग हे चार सदस्य आहेत. तर वीस क्रमांकाचा प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे. या प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोमवारपर्यंत 55 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. दि. 14 सप्टेंबरपर्यंत 21 हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर सोमवारी शेवटच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल 34 हरकती प्राप्त झाल्या. या नव्या प्रभागरचनेत अनेकांचे पूर्वीचे प्रभाग तुटल्याने, संबंधित इच्छुकांची घालमेल वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी या हद्दीसंदर्भातच हरकती नोंदविल्या आहेत.
इचलकरंजी महापालिका प्रभागरचनेवर 22 हरकती
n यंदा कोल्हापूर जिह्यात प्रथमच महानगरपालिकेचा दर्जा मिळालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेची या निमित्ताने पहिल्यांदाच पंचवार्षिक निवडणूक होत आहे. येथे एकूण 16 प्रभागांत 65 नगरसेवक असून, यातील 15 प्रभाग हा चार नगरसेवकांचा, तर शेवटचा सोळावा प्रभाग पाच नगरसेवकांचा असणार आहे. या महानगरपालिकेच्या प्रभागरचनेवर एकूण 22 हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी तब्बल 15 हरकती दाखल झाल्या आहेत. येथेही दि. 22 सप्टेंबरपर्यंत या हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार असून, दि. 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान नगर विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे.