कोल्हापूर मनपा अधिकाऱ्यांनी निधीवाटपात राजकारण करू नये, राजेश क्षीरसागर यांच्याकडून कानउघाडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराच्या विकासासाठी योजनेतून मंजूर झालेल्या निधीवाटपात प्रत्येक प्रभागाला सम प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे. अधिकाऱयांनी त्यात राजकारण व मनमानी कारभार करून महापालिका प्रशासनाची बदनामी करू नये, अशी कानउघाडणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. दरम्यान, शहराला खास बाब म्हणून आणलेल्या पाट कोटींच्या निधीच्या कामांची वर्कऑर्डर लवकर काढून ही कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवावीत, अशी सूचनाही त्यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत निधीच्या घोषणा केल्या आहेत. या कामांचे प्रस्ताव तयार करणे, तसेच शहरात अनेक ठिकाणी मंजुरी नसताना विनापरवाना सुरू असलेल्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज दुपारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह जलअभियंता, घरफाळा, अग्निशमन दल, परिवहन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत क्षीरसागर यांनी विनापरवाना सुरू असलेल्या कामांचा पाढाच वाचला. यावर नियम पाळा; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी महापालिका अधिकाऱयांना दिला. ‘यूडीसीपीआर’ कायद्याची अंमलबजावणी 10 दिवसांत करावी. बांधकाम परवानगीची मागील प्रलंबित प्रकरणे शिबिर घेऊन एका महिन्यात संपवावीत. कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यामुळे हद्दवाढीचा फेरप्रस्ताव आणि महानगरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रस्तावही लवकर सादर करावा आदी सूचनाही क्षीरसागर यांनी दिल्या.