
कागल येथे गहिनीनाथ हजरत गैबी पीर ऊरुसानिमित्त सुरू असलेल्या जत्रेत शुक्रवारी रात्री आकाश पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने ८० फूट उंचीवर १६ जण हवेतच अडकले. यामुळे जत्रेत एकच गोंधळ उडाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडर क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या दोन तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व १६ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कागलमध्ये ऊरुसानिमित्त भरलेल्या जत्रेत उत्साहाचे वातावरण असताना, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आकाश पाळण्यात तांत्रिक बिघाड झाला आणि तो ८० फूट उंचीवर अडकून राहिला. यामध्ये लहान मुले आणि महिलांसह १६ जण अडकले. पाळण्यात अडकलेल्यांनी मदतीसाठी टाहो फोडला, तर खाली नातेवाईक, ऊरूस समिती, पोलीस आणि प्रशासन यांची धावपळ उडाली. सुटकेसाठी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाने टर्न टेबल लॅडर क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या १६ जणांना शेजारील इमारतीवर सावधपणे उतरवले. मध्यरात्री १:३० वाजेपर्यंत हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. सुखरूप सुटका झाल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे जत्रेतील उत्साहाला काही काळ ब्रेक लागला, पण प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
कागलमध्ये आकाश पाळणा ८० फुटांवर अडकला, दोन तास रेस्क्यू ऑपरेशन, १६ जणांची सुखरूप सुटका pic.twitter.com/En8hpqJu39
— Saamana Online (@SaamanaOnline) October 25, 2025



























































