‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवणाऱ्या गावाला 11 हजार रुपयांचे बक्षिस

330

सामना प्रतिनिधी। जयसिंगपूर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जी गावे येत्या गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवितील, त्या प्रत्येक गावाला ११ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. बहुजन पर्व विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील खोत यांनी ही माहिती दिली. जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सुनील खोत म्हणाले, की शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरामुळे असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी उत्सवामध्ये खर्च होणारी शक्ती व पैसा वाचवून समाज उभारणीच्या कामात उपयोगी पडणे, या हेतूने हा उपक्रम राबवित आहोत. शिवाय या योजनेमुळे पोलिसांवरील ताण कमी होईल, गावागावांत एकोपा व बंधुत्त्व वाढेल आणि तेथे जमा झालेल्या वर्गणीची रक्कम तालुक्यातील गावे पुन्हा उभी करण्यासाठी उपयोगी पडेल.

बहुजन पर्व विकास फाऊंडेशनकडून हा उपक्रम राबविणार्‍या प्रत्येक गावाला प्रशस्तीपत्र, सन्मानचिह्न व रोख ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व लोकप्रतिनिधींनी यात सहभाग घेण्यासाठी लोकांचे व मंडळांचे प्रबोधन करावे, असे आवाहन सुनील खोत यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या