
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मध्यरात्री तीनच्या सुमारास पंचगंगा नदीने 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली. पंचगंगेसह जिल्ह्यातील अन्य नद्याही पात्राबाहेर पडून पाणी शेतात पसरले आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणीपातळीत एक फुटाची वाढ झाली असून, नदीची वाटचाल आता 43 फुटांच्या धोका पातळीकडे सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी येणाऱया ज्या-त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत 83 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिह्यांतील 9 राज्यमार्गांसह एकूण 29 मार्ग बंद झाले आहेत.
कोल्हापूर-गगनबावडा, चंदगड-बेळगाव, चंदगड-कोल्हापूर, कागल-पणजी-गडहिंग्लज-नेसरी अशा 14 मार्गांवरील एस.टी. बससेवा बंद झाली आहे. शिवाय जिल्ह्यात 27 घरांची पडझड झाली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी व बोरावडे पैकी मराठवाडी येथील 20 कुटुंबातील 91 व्यक्ती तसेच 15 जनावरांचे त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. धरण पाणलोटातील धुवांधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या चोवीस तासांत जिह्यात सरासरी 39.8 मि.मी., तर चंदगडमध्ये सर्वाधिक 87.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नद्यांमध्ये पाणी वाढण्यापूर्वीच नागरिकांचे स्थलांतर करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील धरणांत 61.47 टीएमसी पाणी
– राधानगरी, वारणा, दूधगंगा, तुळशी या मोठय़ा धरणांसह लहान व मध्यम अशा एकूण 15 धरणांत सध्या 61.47 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या राधानगरी धरणातून 1400 क्युसेक, वारणा 905, कासारी 750, कडवी 150, कुंभी 400, घटप्रभा 6055, जांबरे 4985 आणि कोदे धरणातून 936 क्युसेकने विसर्ग सुरू होता.
– धरणातील सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी ः राधानगरी 7.36 टीएमसी (88 टक्के), वारणा 25.67 (74.61), तुळशी 1.59 (45.84), दूधगंगा (काळमवाडी) 12.01 (47.32), कासारी 2.21 (79.70), कडवी 2.06 (81.83), कुंभी 2.18 (80.25), पाटगाव 2.43 (65.47), चिकोत्रा 0.72 (47.54), चित्री 1.08 (57.29), जंगमहट्टी 0.79 (64.88), घटप्रभा 1.56 (100), जांबरे 0.82 (100), आंबेओहोळ 0.78 (63.02), कोदे 0.21 (100).
चांदोली, कोयनेतून विसर्ग
सांगली, दि. 24 (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत 76, तर कोयना धरण क्षेत्रात 150 मि.मी. पाऊस झाला. कोयना धरणाच्या विद्युतगृहातून सोमवारी दुपारपासून एक हजार 50 आणि चांदोलीतून 905 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणेवरील दुधगाव, शिंगाव, चिकुर्डे (ता. मिरज) सह आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी चालूच असून, मागील 24 तासांत 76 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा धरण 75 टक्के भरल्यामुळे विसर्ग चालू होणार आहे. वारणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. वारणा नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हापूर-सांगली जिह्यांतील नदीकाठच्या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
उजनीत सहा दिवसांत पाच टीएमसीने पाणी वाढले
पाकसाळा सुरू होऊनही 9 जुलैपर्यंत उजनी धरण मायनस 36.19 टक्के होते. त्यामुळे दुबार पंपिंग सुरू करण्याची स्थिती निर्माण झाली होती. लोणावळा, भीमाशंकर, खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने गेल्या सहा दिवसांत उजनी धरणात पाच टीएमसीने पाणी काढले आहे. त्यामुळे दुबार पंपिंगची चिंता दूर झाली असून, शेतकऱयांसह काही शहरांना दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात दौंडवरून 18 हजार 185 क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे.
मुळा धरण निम्म्यावर
26 टीएमसी क्षमता असणारे राहुरी तालुक्यातील मुळा धरण निम्मे भरले आहे. आता मुळा धरणाचा पाणीसाठा तेरा टीएमसीपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या वीस वर्षांत जुलै महिन्यात धरण निम्मे भरण्याची ही बारावी वेळ आहे. नगर जिह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले म्हणजे 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱया मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाकडे नगर जिह्यासह मराठवाडय़ाचेही लक्ष असते. नगर महापालिकेसह विविध नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पाणी योजनाही याच धरणावर अवलंबून आहेत. गेल्या वीस दिवसांत धरणात पाणलोट क्षेत्रातून नव्याने चार टीएमसी पाणी दाखल झाले. यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा तेरा हजार दशलक्ष घनफुटावर म्हणजे निम्म्यावर पोहोचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. जुलै महिन्यातच मुळा धरण निम्मे भरल्याने यंदाही धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याची आशा आहे.
भंडारदरातून 3197 क्युसेकने विसर्ग
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरण 81 टक्के भरले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी 2362 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. धरणातून वीजनिर्मितीद्वारे 835 क्युसेकने विसर्ग सुरू असून, एकूण 3197 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सातारा पश्चिम भागात धुवांधार पाऊस, यवतेश्वर घाटातील महाकाय दगड हटविला
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू असून, सातारा, कराड, कोरेगाव, वाई, खंडाळ्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सातारा कास मार्गावरील घाटात यवतेश्वर, सांबरवाडीनजीकचा धोकादायक महाकाय दगड आज वाहतूक बंद ठेवून फोडण्यात आला. त्या दगडांच्या माऱयाने घाटातील रस्ता व सुरक्षा कठडय़ांचे नुकसान झाले. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने धरणातील पाणीसाठा चोवीस तासांत 5.18 टीएमसीने वाढला आहे. चोवीस तासांत कोयनानगरला 150, नवजाला 201, तर महाबळेश्वरला 185 मि.मी. पाऊस झाला. धरणात 59 हजार 977 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.





























































