
कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आज घडली आहे. पोलीस नाईक विजय जयपाल घाटगे (वय 38, सध्या रा. राजोपाध्यनगर, मूळ रा. नरंदे, ता. हातकणंगले) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय घाटगे हे काल सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. काम करत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 2007 साली पोलीस दलात भरती झालेले घाटगे यांचा 29 जानेवारी रोजी वाढदिवस झाला होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घाटगे यांच्या निधनाची माहिती समजताच, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. नरंदे यांच्यावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
























































