
कणेरी मठाच्या गोशाळेतील गायी दगावल्याच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मठातील स्वयंसेवकांनी मज्जाव आणि मारहाण केल्याच्या घटनेचा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव, तसेच माहिती उपसंचालकांना घटनेची माहिती देण्याचे आश्वासन कणसे यांनी दिले.
1500 वर्षांहून अधिक काळ आध्यात्मिक प्रतिष्ठान लाभलेल्या कणेरी येथील सिद्धगिरी मठात सध्या ‘पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव’ सुरू आहे. यासाठी दररोज हजारो भाविक, पर्यटक, ग्रामस्थ येथे दाखल होत आहेत. येथील विविध सामाजिक उपक्रमांतही पत्रकारांनी सहभाग घेतला आहे. नुकतेच मठाच्या गोशाळेतील गायी मोठय़ा संख्येने दगावल्याचे समोर आले. शिळे अन्न दिल्याने या गायी दगावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या घटनेची माहिती घेत असताना मठाच्या स्वयंसेवकांनी पत्रकारांवरच दगड-धोंडे घेऊन थेट हल्ला केला. याप्रकरणी पत्रकार भूषण पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, तसेच कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून याप्रकरणीही गुन्हा दाखल करावा. दोषींवर कडक कारवाई करावी. राज्य सरकार, कोल्हापूर पोलीस दलाने घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी; अन्यथा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



























































