
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीसह प्रचंड महापुरामुळे राधानगरी तालुक्यातील धामणी नदीवरील म्हासुर्ली ते चौधरवाडीदरम्यान असलेल्या धामणी नदीवरील बंधाऱयाच्या डाव्या व उजव्या बाजूचा भराव रस्ता वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे गगनबावडा तालुक्यात जाणारी वाहतूक पूर्णतः बंद पडली होती. चारचाकी वाहन तर या मार्गावरून जाऊच शकत नव्हते, तर काही दुचाकीधारक जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करीत होते.
म्हासुर्ली ते चौधरवाडी हा गगनबावडा तालुक्याला जोडणारा शॉर्टकट मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून गगनबावडय़ाकडे मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने या रस्त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. बंधाऱयाच्या अलीकडे आमदार आबिटकर यांची हद्द, तर पलीकडे आमदार पी. एन. पाटील यांची हद्द आहे. मात्र, दुरुस्तीअभावी हा रस्ता अनेक दिवस आहे तसाच आहे. बेळगाव-निपाणी-म्हासुर्ली-गगनबावडा असा हा रस्ता मंजूर आहे. त्यातूनच अतिशय खडतर असा हा एक किमीचा रस्ता आहे. गेली पंधरा वर्षे अनेकवेळा या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रवासी जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱयांनी लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करावा, अशी मागणी होत आहे.


























































