‘गोकुळ’चा किल्ला सर; आता ‘राजाराम’ वर नजर, सतेज पाटील-महाडिक यांच्यातील सामना पुन्हा रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बाजी मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ पॅनेलच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने नुकतीच जिंकली. आता गृहराज्यमंत्री व जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेव महाडिक यांच्या राजकीय प्रतिष्ठsचा प्रश्न बनलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोरोनाचे संकट निवळल्यानंतर होणार आहे. त्यामुळे राजाराम कारखान्यावर कुणाची सत्ता येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

1984 साली खासगीतून सहकारात आलेल्या या कारखान्याचे ‘श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना’ असे नामकरण करण्यात आले होते. 1994 पासून महादेव महाडिक यांनी सलग पाच वेळा निवडणुका जिंकत कारखान्यावर आपले एकतर्फी वर्चस्व अबाधित ठेवले आहे; परंतु महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात टोकाचे राजकीय वैमनस्य निर्माण झाल्यानंतर या कारखान्यावरील महाडिक यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी करून मोठे आव्हान निर्माण केले आहे. यातूनच 2015 मध्ये झालेल्या लढतीत शंभर ते तीनशेच्या मतांतील फरकाने महाडिक यांची झोप उडविली होती.

दरम्यान, निकष पात्रतेवरून 1 हजार 899 सभासदांच्या सभासदत्वाबाबत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कागदपत्रांच्या छाननीतून आवश्यक पात्रता नसलेले 1008 आणि कार्यक्षेत्राबाहेरील 338 असे कारखान्याचे एकूण 1346 सभासद अपात्र ठरल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिला होता. कारखान्याने यावर सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. अपिलाचा निर्णय लवकर व्हावा म्हणून अपात्र सभासदांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सहकारमंत्र्यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचा अपात्रतेचा निर्णय सहकारमंत्र्यांनीही कायम ठेवला होता.

आमचं ठरलंय – राजाराम उरलंय…

गेल्या निवडणुकीत मंत्री सतेज पाटील यांनी एकतर्फी फाईट देऊन महाडिकांना घाम फोडला होता. आता महाविकास आघाडीचे समीकरण असल्याने अनेक मातब्बर त्यांना साथ देतील. गोकुळसारखे ‘आमचं ठरलंय, राजाराम उरलंय’ अशी परिस्थिती आहे. राजाराम कारखान्याच्या 2017-18च्या अहवालानुसार ‘अ’ वर्ग उत्पादकांची संख्या 16 हजार 734 आहे, तर 19 संचालक आहेत. डिसेंबर 2019 मध्ये या कारखान्याच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला होता. ‘ब’ वर्ग संस्था गटांचे 136 पैकी 126 सभासदांचे ठराव दाखल झाले होते, याची अंतिम यादीही झाली आहे.