
म्हैसूर पाठोपाठ नवरात्रोत्सवातील मुख्य सोहळा असणारा करवीर संस्थानचा शाही विजया दशमी दसरा सोहळा शुक्रवारी करवीरनगरीत पारंपरिक थाटात संपन्न झाला.निमंत्रित आणि छत्रपतींच्या शाही परिवाराच्या उपस्थित विधीवत व मोठ्या उत्साहात झालेल्या ऐतिहासिक दसरा चौकातील सीमोल्लंघनाच्या या संस्मरणीय सोहळ्याने यंदाच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या करवीर नगरीचा नवरात्रोत्सव सण वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात करवीर संस्थानचा विजयी दशमी दिनी होणारा सीमोल्लंघनाचा सोहळा म्हणजे येथील वैभवाचे आणखी एक प्रतिक आहे. आजही शाही परिवाराच्या उपस्थित हि परंपरा जोपासली आहे. पण गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे ऐतिहासिक दसरा चौक ऐवजी जुना राजवाडा येथील छत्रपतींचे देवघर असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काही मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करून, या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यंदा मात्र कोरोना संसर्गाचा जोर कमी राहिल्याने, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पूर्ववत हा सोहळा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत या दसरा सोहळ्याचे आयोजन केले होते.
परंपरेनुसार सूर्यास्तावेळी पायी येणाऱ्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई, श्रीतुळजाभवानी व गुरू महाराज यांच्या पालख्या मोजक्या मानकर्यांसह वाहनातून ऐतिहासिक दसरा चौकात पारंपरिक वाद्ये आणि बंदुकीचे हवेत उडणारे बार अशा वातावरणात दाखल झाल्या.पाठोपाठ नविन राजवाडा येथुन पारंपरिक “मेबॅक” वाहनांसह छत्रपतींच्या शाही परिवाराचे लवाजम्यासह आगमन होताच, प्रादेशिक सेना व जिल्हा पोलीस दलातील बँड पथकांकडून करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
दसरा महोत्सव समितीच्यावतीनेही या शाही कुटुंबाचे स्वागत केले.तर सूर्यास्तावेळी सायंकाळी 6 वा.9 मिनिटांनी, वैदिक पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मैदानात सजवलेल्या शमींच्या पानांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. युवराज व खासदार छत्रपती संभाजीराजे,महाराजकुमार छत्रपती मालोजीराजे, युवराज कुमार छत्रपती शहाजीराजे, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच, हवेत बंदुकीच्या फैरी झडताच कोल्हापूरकरांनी सोनं लुटण्यासाठी मैदानात धाव घेत, सीमोल्लंघन केले.
यानंतर छत्रपतींचा शाही परिवार लवाजम्यासह जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार करत,जुना राजवाडा परिसरात श्रीतुळजाभवानी व करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रवाना झाला.तर दसरा चौक येथे दाखल झालेल्या श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई आणि गुरु महाराजांच्या पालख्या सजलेल्या वाहनातुन पारंपरिक मार्गाने मंदिरांकडे मार्गस्थ झाल्या. रात्री पंचगंगा नदीच्या काठावरील शिवसागर येथील पूर्वजांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेऊन, शाही परिवार नविन राजवाड्यात परतला.
या सोहळयास पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, इतिहास संशोधक डॉ.रमेश जाधव, इंद्रजित सावंत, वसंत मुळीक आदींसह करवीर छत्रपतींचे सरदार, मानकरी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील निमंत्रित उपस्थित होते.
मोबाईलचे कॅमेरेच पुढे
निमंत्रितांच्या उपस्थित हा सोहळा होणार असल्याने, सर्व बाजूंनी पोलिसांनी सामान्य नागरिकांना पूर्णपणे मज्जाव केला होता.गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांना हा सोहळा पाहता यावा, यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीनसह सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तरीसुद्धा दसरा चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
त्यात शमीची पानं लुटल्यानंतर तेच सोनं म्हणून देत, जनतेकडून छत्रपतींच्या शाही परिवाराला शुभेच्छा दिल्या जातात. यंदा मात्र या शुभेच्छा कमी पण शमीच्या पानाऐवजी जो-तो मोबाईल पुढे करुन, शाही परिवाराच्या वाहनाभोवती चित्रीकरण करण्यास धडपडत असल्याचे दिसून येत होते.


























































