
मुंबईतील सहकारी संस्थांनी आपल्या तत्त्वाला जागत पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला आहे. कोल्हापूर-सांगली जिह्यात पुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार सहकारी संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन सहकार आयुक्तांनी केले होते. त्यानुसार मुंबई विभागातील 52 सहकारी संस्थांनी तब्बल 44 लाख रुपयांचा निधी सहकार विभागाकडे जमा केला आहे. ते लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत थेट 37 लाख रुपये जमा
मुंबई विभागातील अनेक सहकारी संस्थांनी पूरग्रस्तांकरिता थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाकडे सुमारे 37 लाख 21 हजार रुपये एवढा निधी जमा केला आहे.


























































