कोल्हापूर – शिवसैनिकांनी काढली कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

738

मराठी भाषिकांवर सतत अत्याचार करणा-या भाजपच्या कर्नाटक सरकारने आता तमाम हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवुन घोर अवमान केला आहे. याचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. शिवसैनिकांनी सीमारेषेवर जाऊन भाजपच्या कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन,तिरडी दहन केली. तसेच उद्या सीमाभागातील मनगुत्ती गावात घुसुन धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मनगुत्ती, जि. बेळगांव येथील ग्रामपंचायतीचा ठराव असुन सुद्धा रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा निचपणा करुन, भाजपच्या कर्नाटक सरकारने मराठी भाषिकां प्रति असलेला द्वेष पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. कर्नाटक विरोधात सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. आज दुपारी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील आयबीपी पेट्रोल पंप ते दुधगंगा नदी पुलावर (कोगनोळी टोल नाका) धडक देऊन, भाजपच्या कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविले. यावेळी कर्नाटक सरकारच्या नावाने शंखध्वनी करत तिरडी पेटवुन तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी भोकरे, शिवाजी जाधव, राजु यादव, विनोद खोत, विराज पाटील, मंजित माने, प्रतिक क्षीरसागर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

उद्या मनगुत्तीत घुसुन आंदोलन करणार – विजय देवणे
कायद्याने ठराव करुन उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवुन भाजपच्या कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा लोकशाहीची पायमल्ली केली आहे. उद्या सोमवार पर्यंत हा पुतळा सन्मानाने बसविण्याची मागणी शिवसेना नेते व महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे. तमाम मराठी भाषिकांनीही हि मागणी केली आहे. मनगुत्ती गावातील जनतेच्या भावना आणि शिवरायांचा पुतळा पुन्हा आहे त्याच ठिकाणी सन्मानाने बसविण्यासाठी उद्या (सोमवारी) दुपारी शिवसैनिक थेट कर्नाटकात मनगुत्तीत जाऊन धरणे आंदोलन करणार असल्याचे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी यावेळी जाहिर केले.

…तर बेचीराख व्हाल – संजय पवार
खासदार उदयनराजे यांच्या शपथविधीवेळीही व्यंकय्या नायडु यांनी अवमान केला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारने तर शिवरायांचा कायदेशीर पुतळाच हटवुन अवमान केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा अवमान यापुर्वीही खपवुन घेतला नाही. यापुढेही खपवुन घेणार नाही. महाराष्ट्रात एकदा आगडोंब पसरला तर बेचीराख झाल्या शिवाय राहणार नाही असा खरमरीत इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती भाजपचे प्रेम म्हणजे केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठीचा असून शिवसेनाप्रमुखांचे बोट धरून महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपने, शिवभक्तांच्या नादाला लागु नये असेही सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या