
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष यंदा ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारा आणि भविष्याचा वेध घेणाऱया या लोकराजाला अभिवादन करण्यासाठी सारा पश्चिम महाराष्ट्र शुक्रवारी सकाळी शंभर सेकंद स्तब्ध झाला. शिवारातील शेतकऱयापासून ते रुग्णालयातील रुग्ण आणि चालत्या बसमध्ये प्रवाशांकडूनही छत्रपती शाहूंचे स्मरण करून, नतमस्तक होऊन सर्वत्र अभिवादन करण्यात आले.
राजर्षी शाहू समाधी स्मारक परिसरात शहरातून पाच ठिकाणी, तर जिह्याच्या प्रत्येक तालुक्यातून सकाळी समता व कृतज्ञता फेरी दाखल झाली. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून संपूर्ण कोल्हापूरकरांनी आपल्या भाग्यविधात्याला अभिवादन केले. श्री शाहू छत्रपती मिल येथे कृतज्ञता सभा घेण्यात आली. जिल्ह्यातून 17 ठिकाणांहून शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी दाखल झाल्या. जिह्यातील अनेक गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी एकत्रित जमून लोकराजाला अभिवादन करण्यात आले.





























































