चिकन सँडविचवरून विद्यार्थ्यांची हाणामारी, शाळांनी काढलं शाकाहाराचं फर्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

शाळेत मित्रांशी मारामारी केली नाही, अशी व्यक्ती मिळणं जरा कठीणच. पण, लहानग्यांची मस्ती काही शाळांना आता चांगलीच महागात पडताना दिसत आहे. कारण, एका लहानश्या मारामारीमुळे कोलकात्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत मांसाहारी पदार्थ आणण्याची बंदी केली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकात्यातील एका प्रसिद्ध शाळेत सहाव्या इयत्तेतील काही मुलांमुळे हे प्रकरण सुरू झालं. मधल्या सुट्टीच्या वेळी या मुलांमधील एका मुलाने डब्यात चिकन सँडविच आणलं होतं. त्याने ते आपल्या शाकाहारी वर्गमित्राला खायला दिलं. मात्र, त्याने ते मांस असल्याचं त्याला सांगितलं नाही. जेव्हा शाकाहारी मुलाच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्याने दंगा करायला सुरुवात केली. मित्राची फसवणूक झालेली पाहून इतर मुलांनी चिकन सँडविच देणाऱ्या मुलाला मारायला सुरुवात केली. मुलांच्या हाणामारीमुळे शाळा प्रशासनाने त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून घेतलं, तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. सँडविच देणाऱ्या मुलाने आपल्याला मित्र शाकाहारी असल्याचं ठाऊक नव्हतं, असं स्पष्ट केलं. त्यानंतर शाळेने हे प्रकरण मिटवत एक नोटीस जारी केली आणि वर्गात मांसाहार करण्यावर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, या गोष्टीवरून उडालेला गहजब पाहून इतर शाळांना मात्र सावध पवित्रा घेण्याचं निश्चित केलं आहे. कारण, कोलकात्यासारख्या ठिकाणी शाळेत मांसाहारावर बंदी घालणं कठीण आहे. त्यामुळे शाळागणिक वेगवेगळी नियमावली काही शाळांनी वर्गात मांसाचे पदार्थ आणण्यावर बंदी घातली आहे. काही शाळांनी प्रांगणात मांसाहार करण्यास परवानगी दिली असली तरी वर्गात मात्र त्यावर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. काही शाळांनी फक्त मांसावर बंदी घालून मासे आणि अंड्याचे पदार्थ आणण्याची सूट दिली आहे, तर काही शाळांनी घराऐवजी शाळेतच मांसाहार शिजवण्याचे निर्णय घेतले आहेत. तसंच, शाळेत काही कारणाने खाद्यपदार्थांचं वाटप झाल्यास, ते पदार्थ संपूर्ण शाकाहारी असतील, याची काळजी घेतली आहे. याखेरीज या शाळांनी वर्गमित्रांना डब्यातला खाऊ देण्यापूर्वी ते शाकाहारी अन्न आहे किंवा नाही, याची स्पष्ट कल्पना देण्याचा आदेश विद्यार्थ्यांना दिला आहे.