
पोलीस हा शब्द उच्चारला तरी सर्वसामान्यांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण होते. मात्र, काहीवेळा अशा घटना समोर येतात की ज्यामुळे आपल्याला पोलिसांमधील देवमाणसाचे दर्शन घडते. त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढतो. सध्या कोलकातामधील एक वाहतूक पोलीस आपल्या कृतीमुळे सर्वांचे मन जिंकुन घेत आहे. आपली डय़ुटी सांभाळून रस्त्यावरील एका आठ वर्षीय गरीब मुलाला शिकवण्यासाठी हा पोलीस आता शिक्षकाची देखील भूमिका पार पाडतोय.
कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या आठ वर्षीय मुलाची आई रस्त्याच्या कडेला एक छोटसं हॉटेल चालवते. डोक्यावर हक्काचे छप्पर नसल्यामुळे हे मायलेक रस्त्यावरच राहतात. एक ना एक दिवस आपला मुलगा शिकुन मोठा होईल. गरीबीच्या बेडीतून मुक्त होऊन समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा त्याच्या आईला विश्वास आहे. परंतु, तिसरीत गेल्यानंतर या मुलाची शिक्षणाविषयीची आवड कमी व्हायला लागली. त्यामुळे महिलेला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावत होती. आपली व्यथा तिने बल्लीगंज आयटीआय चौकातील सार्जेंट प्रकाश घोष या वाहतूक पोलीसाला बोलून दाखवली. त्यानेही या मुलाला शिकवण्याचा विडा उचलला.
‘द टीचर कॉप’ असे म्हणत कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावरून या वाहतूक पोलिसाच्या कार्याचे काwतुक केले आहे. सोबत त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यात वर्दीमधील एक वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गरीब मुलाला शिकवताना दिसतोय. कर्तव्य बजावताना हा पोलीस आधी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करतो त्यानंतर फूटपाथवरील या मुलाला शिकवतो.


























































