मलमपट्टी आणि हकालपट्टी! ‘कोमसाप’त शिमगा… प्रयोग रंगतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कारभारात अनियमितता असून संस्थेची मान्यताच रद्द करा, अशी तक्रार तीन सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली. त्याची ‘बातमी’ होताच कोमसाप झडझडून कामाला लागली आणि 19 फेबुवारीला मालगुंडच्या (जि. रत्नागिरी) केशवसुत स्मारकात तातडीची बैठकही बोलावली. या बैठकीतील चर्चेचा गोषवारा आता खुलाशाच्या रूपात प्रसारमाध्यमांकडे पोहचला असून या नऊ पानी पत्रात संस्थेने तक्रार बनावट असल्याचे म्हटले आहे. शिवाय संस्थेच्या कारभाराबाबत चोख खुलासा केला असून माजी अध्यक्ष महेश केळुसकर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

यावर केळुसकर यांनीही ‘आता होऊनच जाऊ द्या’ची भूमिका घेत आपलेही म्हणणे पत्रकारांसमोर मांडले आहे. एकूणच ‘कोमसाप’त आता ‘मलमपट्टी आणि हकालपट्टी’चा प्रयोग रंगतोय अशी खुमासदार चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे.

‘कोमसाप’ने खुलासा केला आहे तो येणेप्रमाणे… धर्मादाय आयुक्तांकडे दरवर्षी चेंज रिपोर्ट पाठवले जातात. मध्यंतरी एका पदाधिकाऱयाचा अचानक मृत्यू झाल्याने एका टर्मचा रिपोर्ट पाठवायचा राहून गेला. आता त्या टर्मची अनियमितता दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेचे सर्व हिशेब पूर्ण आणि समाधानकारक असल्यामुळेच संस्थेला सरकारी अनुदान मिळते, असे प्रभारी अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी म्हटले आहे. केशवसुत स्मारक भूखंडावरून मालगुंड एज्युकेशन सोसायटीशी कोमसापचा कोणताही वाद नाही. तसेच काव्यदालन, काव्यशिल्प आदी सारे कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव तेथे असणे यात गैर नाही, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

कीर दांपत्याची नियुक्ती

रमेश कीर यांची नियुक्ती घटनेतील तरतुदीनुसार आणि नमिता कीर यांची मुदतवाढही घटनेप्रमाणे व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनेच झाली आहे, असा दावा कोमसापने केला आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी 1991 ते 2006 पर्यंत अध्यक्ष म्हणून परिषदेची व स्मारकाची उभारणी करून ते बाजूला झाले. केशवसुत स्मारकासाठी खर्च झालेले दोन कोटी रुपये मधुभाईंनीच एकहाती जमा केलेले आहेत, असे संस्थेने म्हटले आहे.

केळुसकर यांची हकालपट्टी

या सर्व आरोपांमागे महेश केळुसकर यांची कोमसापतून हकालपट्टी करण्याचा निर्णय सभेत झाला आहे. केळुसकर यांनीच गजानन खांडोरी आणि विलास सरमळकर यांच्या खोटय़ा सहय़ा करून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दिल्याचा संशयही या खुलासापत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या पत्राला खांडोरी आणि सरमळकर यांची इन्कारपत्रेही संस्थेने जोडली आहेत.

माझी हकालपट्टी हास्यास्पद

‘कोमसाप’ने केलेल्या खुलाशावर महेश केळुसकर यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिखुलासा पाठवला आहे. मी एप्रिल 2019 मध्येच राजीनामा दिला आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2020 मध्ये माझी हकालपट्टी करणे हे बेकायदेशीर आणि हास्यास्पद असल्याचे केळुसकर यांनी सांगितले.

खांडोरी आणि सरमळकर यांच्या इन्कारपत्रात त्यांच्या खोटय़ा सहय़ा मी केल्यात असे कुठेही म्हटलेले नाही. कोमसापने केलेला खुलासा मूळ प्रश्नांना बगल देणारा आणि दिशाभूल करणारा आहे असे सांगून केळुसकर म्हणतात, मधु मंगेश कर्णिक हे आपण पुढच्या कार्यकर्त्यांकडे कारभार सोपवला असे भासवतात; पण त्यांचे संस्थात्मक लोभ सुटलेले नाहीत. कोमसापच्या प्रत्येक सभेला ते हजर असल्याचे रेकॉर्डवरून दिसेल. आपले नाव केशवसुत स्मारकात सगळीकडे हवे असे ठराव त्यांनी वेळोवेळी करवून घेतलेत. त्यांचा हव्यास अजून संपलेला नाही, असे केळुसकर यांनी म्हटले आहे.

कर्णिक अध्यक्ष असताना त्यांनी ‘कोकण साहित्य भूषण’ हा पुरस्कार स्वतःला जाहीर करवून स्वीकारलेला आहे. तसेच अन्य काही विश्वस्तांनीही तीनतीनदा वेगवेगळे पुरस्कार पदरात पाडून घेतले आहेत. कवितेतील योगदानाबद्दल मला पुरस्कार समितीने जाहीर केलेला ‘राजधानी’ पुरस्कार मत्सरग्रस्त कीर दांपत्याने प्रश्न उपस्थित केल्यावर स्वाभिमानाने रकमेसहित त्वरित परत केला, पण मधु मंगेश कर्णिक यांनी स्वतःच्याच संस्थेचा पुरस्कार परत करण्याची नैतिकता दाखवलेली नाही, अशा परखड शब्दांत महेश केळुसकर यांनी प्रतिखुलासा केला आहे. शिवाय कायदेशीर लढाईला आपण तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी कोमसापला दिले आहे.