
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
भव्य सभामंडप, सनई-चौघडय़ाचे सूर आणि ‘शुभमंगल सावधान’ मंगलाष्टकांच्या घोषात 35 जोडपी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली. निमित्त होते शिवसेनेने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याचे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहून या जोडप्यांना आशीर्वाद दिले. ‘आनंदात राहा, चांगले राहा… एकमेकांच्या तक्रारी पालकांकडे करू नका. नांदा सौख्यभरे…’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना आणि क्लासिक स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरीतील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी 35 जोडप्यांचे शुभमंगल सावधान झाले. जोडप्यांना लग्नाचा पोशाख, वधूला मंगळसूत्र, संसारोपयोगी वस्तू, येण्याजाण्याचा खर्च आणि वऱहाडी मंडळींच्या जेवणावळीचे शिवसेना आणि क्लासिक स्टीलने मोफत आयोजन केले. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री रवीद्र वायकर, माजी पालकमंत्री रवींद्र माने, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार राजन साळवी, क्लासिक स्टीलचे संचालक कांतीलाल मारू, महिला आघाडीच्या मीनल जुवाटकर, शिल्पा सुर्वे, वेदा फडके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जया सामंत उपस्थित होते.
कोकणात सामूहिक विवाहाची परंपरा शिवसेनेने निर्माण केली-सुभाष देसाई
कोकणात सामुदायिक विवाहाची पद्धत नाही. ही पद्धत शिवसेनेने कोकणात निर्माण केली आहे. यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. त्यानंतर आज रत्नागिरीत विवाह सोहळा आयोजित केला आहे. आर्थिदृष्टय़ा दुर्बल कुटुंबांना सामुदायिक सोहळय़ामुळे आधार मिळाला आहे, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
नाणारमधील शेकडो संसार वाचवले-विनायक राऊत
सामुदायिक विवाह सोहळय़ातून 35 संसार उभे राहणार आहेतच पण त्याआधी रिफायनरी प्रकल्प रद्द करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार परिसरातील शेकडो संसार वाचवले आहेत. हा प्रकल्प झाला असता तर नाणार परिसरातील चौदा गावांतील अनेक संसार उद्ध्वस्त झाले असते, असे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत म्हणाले.
































































