
मागील आठ दिवसापासून फोंडाघाट नजीकच्या घोणसरी गावातील बोंडगवाडी-पिंपळवाडी परिसरात फिरणाऱ्या बिबट्या नर-मादी आणि दोन बछड्यांपैकी एका बछड्यास जेरबंद करण्यात फोंडाघाट वनपाल क्षेत्र अधिकाऱ्यांना यश आले.
फोंडाघाट पासून जवळच असणाऱ्या घोणसरी गावातील बोंडगवाडी-पिंपळवाडी परिसरात बिबट्याची नर-मादी आणि दोन बछडे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे स्थानिकांनी फोंडाघाट वनपाल अधिकाऱ्याची भेट घेत सदर बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार फोंडाघाट वनपाल अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काही दिवस या परिसराची पाहणी करून ठिकठिकाणी कॅमेरे लावले होते. बिबट्याचा या भागातील वावर लक्षात घेऊन तसेच त्याने केलेल्या इतर वन्य प्राण्यांची शिकार त्याचे पुरावे व त्याचा येण्याचा मार्ग लक्षात घेऊन काल बिबट्यासाठी भक्ष ठेवून पिंजरा लावण्यात आला होता. वनाधिकाऱ्यांच्या अपेक्षेनुसार बिबट्याचा बछडा अलगद वन अधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकला असून सदर बिबट्याच्या बछड्यास कोल्हापूर वनपाल क्षेत्रामध्ये नेण्यात आला आहे.






























































