50 पैशांनी मुंबई-गोवा महामार्ग केला जाम; मध्यरात्री सीएनजी दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या हजारो गणेशभक्तांची लटकंती

लाडक्या बाप्पाला निरोप देऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या हजारो चाकरमान्यांचा बुधवारी रात्री भररस्त्यात ‘मोरया’ झाला. सीएनजीचे दर काल रात्रीपासून ५० पैशांनी वाढवण्यात आले. मात्र नवे दर अपडेट करण्याकरिता सर्वच सीएनजी पंप अर्धा तास बंद ठेवण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील पंपांवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. गाड्यांच्या या रांगा थेट मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने त्याचा फटका अन्य वाहनांनादेखील बसला. त्यामुळे ५० पैशांच्या दरवाढीने ट्रॅफिकचा अक्षरशः ‘तमाशा’ झाला.

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले हजारो गणेशभक्त आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र ऐन गणेशोत्सवात सीएनजीच्या दरात वाढ केल्याने याचा जबरदस्त फटका हजारो प्रवाशांना आणि गणेशभक्तांना बसला. बुधवारी रात्री अचानक ५० पैशांनी वाढ केली. मात्र या दर वाढीनंतर नवे दर अपडेट करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील जवळपास १५ सीएनजी पंप अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी हा घोळ अधिक सुरू होता. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाड्यांमध्ये कुटुंबासह लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. अनेक ठिकाणी वाहनचालक आणि सीएनजी पंप कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले.

कोकणवासीयांच्या त्रासात भर

कोकणात बहुतांश गणेशमूर्तीची स्थापना दीड दिवस, पाच दिवस असते. त्यामुळे आता गणेशभक्त मुंबईला परतत असून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा आधीच त्यांना फटका बसत असताना दुसरीकडे सीएनजीची दरवाढ आणि त्यामुळे झालेली लटकंती यामुळे कोकणवासीयांच्या त्रासात भरच पडत आहे.

ही तर सर्वसामान्यांची लूट

दरवाढ आणि खोळंब्यामुळे रात्री उशिरा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. गॅससाठी ताटकळणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे अन्य वाहनांनाही पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. काही वाहनचालकांनी पंपावरच निदर्शने करण्याचा इशारा दिला. अनेक गणेशभक्त आणि वाहनचालक रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या स्फोटानंतर आता दिवसेंदिवस सीएनजीचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडत असून हीं लूट असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.