कोकण रेल्वेत सापडले 33 हजार 840 फुकटे प्रवासी

902

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाडीतून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. फुकट्या प्रवाशांना पकडण्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांना यश आले आहे. गेल्या सहा महिन्यात कोकण रेल्वेच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोकण रेल्वेमार्गावरून दररोज 35 ते 38 गाड्या धावतात. शिमगा किंवा गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावरून 50 हून अधिक गाड्या धावतात. या गाड्यामधून अनेकवेळा फुकटे प्रवासी प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेऊन तर कधी तिकीट तपासनीसची नजर चुकवून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यात भरारी पथकाल यश आले आहे. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी कोकण रेल्वे नियमित तपासणीबरोबरच विशेष भरारी पथकांची नेमणूक करते. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेने 1721 कारवाया करत तब्बल 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून 1 कोटी 87 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबर जनरलचे तिकीट असताना स्लीपरच्या डब्यातून प्रवास करणे किंवा स्लीपरचे तिकीट असताना एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यातील तपासणीबरोबरच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ तिकीट तपासणी केली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या