कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द, भर पावसात प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

आपटा ते जीते रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने आणि मुंबई,ठाणे परिसरात पाणी भरल्याने विस्कळीत झालेल्या मध्य रेल्वेमुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. पुढील २४ तासात कोकण रेल्वेमार्गावरून एकही गाडी धावणार नाही.

रूळावर कोसळलेल्या दरडीचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. एकूण 12 गाड्या रद्द झाल्या आहेत.त्यामध्ये मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्सगंधा एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, कोचुवली-एलटीटी एक्सप्रेस,दादर-रत्नागिरी पॅसेंजर, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस,दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला असून ती गाडी इगतपुरी मार्गे सोडण्यात आली आहे. दुरांतो एक्सप्रेस हि गाडी सुरत जळगाव मार्गे वळविण्यात आली. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी रोहा स्थानकापर्यंत सोडण्यात आली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजर हि गाडी रत्नागिरी स्थानकापर्यंत सोडण्यात आली. मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकापर्यंत सोडण्यात आली. तेजस एक्सप्रेस नांदगाव पर्यंत धावली त्यानंतर रिकामी गाडी करमाळीला पाठविण्यात आली. जनशताब्दी एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या कुडाळ पर्यंत सोडण्यात आल्या तिथून त्या रिकाम्या मडगावला पाठविण्यात आल्या. डबलडेकर गाडी सावंतवाडी पर्यंत सोडण्यात आली तिथून रिकामी गाडी मडगावला नेण्यात आली.

भर पावसात प्रवाशांचे हाल
भरपावसात कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना भरपावसात रेल्वे स्थानकावरच आसरा घ्यावा लागला आहे. उद्या पावसाचा जोर कमी झाला आणि गाड्या सुरु होण्याच्या आशेवर अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकात ठाण मांडला. रस्ते, रेल्वे दोन्ही बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.