
कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमा तीव्र केल्या असून फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात कोकण रेल्वेने १ हजार ७० विशेष राबवून ४२ हजार ९६५ फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विनातिकीट प्रवासाविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित करत, कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणी मोहिमांची वारंवारता वाढवली आहे. या प्रयत्नांचे उद्दिष्ट तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि अधिकृत प्रवाशांसाठी सुरळीत, आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत, एकूण ७ हजार ४८३ विशेष मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामध्ये २ लाख ९० हजार ७८६ अनधिकृत व अनियमित प्रवासी आढळले. या कालावधीत देय रेल्वे भाडे आणि दंड म्हणून १७ कोटी ८३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करते. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि संपूर्ण मार्गावर तिकिट तपासणी मोहिमा अधिक लक्ष केंद्रित करून सुरू राहतील. सर्व अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी केआरसीएल येत्या हिवाळा आणि ख्रिसमसच्या सणांच्या काळात त्यांच्या संपूर्ण मार्गावर तिकिट तपासणी मोहीम तीव्र करणार आहे.


























































