
कोकणातील नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ साचल्याने पाणी वाहून जाण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीचा फटका महाड, चिपळूण, संगमेश्वरसारख्या शहरांना व नदीकाठच्या शेतजमिनींना बसला होता. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातल्या नद्यांमधील गाळ युद्धपातळीवर काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोकणातील अतिवृष्टी व पुराचा फटका महाडपासून चिपळूण व अन्य काही शहरांना बसला होता. या पार्श्वभूमीवर कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
कोकणातील नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साठला असून अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. कोकणात मुळात पावसाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षांत कोकणाला सातत्याने अतिवृष्टीचा फटका बसत आहे. यामुळे कोकणातील नद्यांच्या काठी पूरस्थिती निर्माण होऊन शहरे, गावातील नागरी वस्त्यांचे, नदीकाठच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. वारंवार होणारे हे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नद्यांमधील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करावे. त्यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वितरित करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.
महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा.
- वाशिष्टी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढणार
- नदीपात्रातील बेटेही काढणार
- पूरस्थिती नियंत्रणासाठी बैठक
- जलसंपदा विभागाला तातडीने निधी
- गाळ काढण्यासाठी मशिनरी खरेदी




























































