
राज्यभर गाजलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी उद्या (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर होणार आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे आपण बाजू मांडणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी दिली.
कोपर्डी येथील अत्याचार आणि खूनप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणासाठी राज्य सरकारने संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे, यातील आरोपी संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात संभाजीनगर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी संभाजीनगर खंडपीठात होऊन यातील आरोपी भवाळ याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात आले होते.
आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण संभाजीनगरहून मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती. संभाजीनगर येथे प्रलंबित असणारे आरोपी भवाळचे अपील त्याचप्रमाणे राज्य शासनाने दाखल केलेले फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणाचे अपील ही दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. तसेच आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी नितीन भैलुमे यांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केली आहेत. या तिन्ही प्रकरणासह राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.





























































