
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली सुरू झाली आहे परंतु निवडणुकीमध्ये काही उत्साहच वाटत नाही समोर कोणी दिसतच नाहीये, आपले सर्व पैलवान तेल लावून मैदानात उतरले आहेत. परंतु समोर दुसरा पैलवानच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी निवडणुकीपूर्वी पराभव मान्य करून बँकॉकला निघून गेले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था “आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ’ अशी झाली आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडवली. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) कोपरगाव येथील सभेत महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारात ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकमेकांशी कसलाच संबंध उरलेला नाही. त्यामुळे ते पहिल्यापासूनच पराभवाच्या मानसिकतेत गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढविला आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात त्यांनी जगातील सर्व आश्वासने देऊन टाकली आहेत. केवळ प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन देणे बाकी आहे. याचा अर्थ त्यांना आश्वासने पूर्ण करायची नाहीत, हेच त्यांचे धोरण आहे, गेली पन्नास वर्षे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे राजकारण त्यांनी केले. त्यांनी जनतेला कधीच फायदा करून दिला नाही. उलट स्वतःचा फायदा करून घेतला असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा वाचून दाखविण्यात आला,
राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्याच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. कोणती गोष्ट राज्याचे हिताची करताना पक्षीय राजकारण यापलीकडे जाऊन राज्याच्या जनतेच्या जीवनात आपल्याला बदल करता आला पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या मनात होती. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही साधीसुधी घोषणा नाही. यासाठी फार मोठे धाडस लागते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एक नवी भूमिका, एक विकासाची भूमिका घेऊन आपल्या आमदार स्नेहलता कोल्हे निघाल्या आहेत. विलक्षण धडपड त्यांच्या मध्ये मला पाहायला मिळते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, खासदार सदाशिव लोखंडे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, संजीवनी एज्युकेशन कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, काका कोयटे, रवीकाका बोरावके, संभाजी दहातोंडे आदीसह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते



























































