
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत समृद्धी महामार्गात बाधित झाली असून भरपाई पोटी साडेतीन कोटी रुपये मिळाले आहे. मात्र याच पैशावरून भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमिटी व जुने चांदेकसारे स्कुल कमिटी ट्रस्ट यांच्यात वाद सुरू असून साडेतीन कोटी रुपये बिगर व्याजी न्यायालयात पडून आहेत. गेल्या चार वर्षापासून शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेक वेळा पालकांनी शाळा बंद करत आंदोलन केले. गावातील कार्यकर्त्यांनी दोन्ही स्कूल कमिटीच्या प्रमुखांची भेट घेऊन शाळेच्या इमारतीसाठी तरी आपण दोन पावले मागे या अशी विनंती केली. मात्र न्यायालयात वाद सुरू असून लवकरच निकाल लागेल असे वेळ काढू उत्तर दोन्हीच संस्थांकडून मिळत आहे. भारत सर्व संघ न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमिटी चांदेकसारे वतीने शंकरराव चव्हाण न्यायालयात आपली बाजू मांडत आहे. तर चांदेकसारे स्कूल कमिटी जुनी ट्रस्टच्या वतीने संजय होन हे बाजू मांडत आहे. कोर्टात निकाल केव्हा होईल हे सांगता येत नाही. त्यांची मानसिकता आता फक्त न्यायालयाच्या निकालावरच अवलंबून असल्याचे दिसते. त्यामुळे तिढा सुटण्याचे चिन्ह दिसत नाही.त्यामुळे 700 विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी टांगले आहे. दोन्हीही स्कूल कमिटींना देव सद्बुद्धी देवो आणि चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कूलची इमारत पूर्ण होहो अशीच अपेक्षा चांदेकसारे येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


























































