दारुच्या नशेत भावानेच केला भावाचा खून, करवीर तालुक्यातील घटना

प्रातिनिधिक फोटो

दारूच्या नशेत जुन्या भांडणाच्या रागातून सख्ख्या भावाने भावाचाच लोखंडी फुकणीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुरेश गुलाब कांबळे (वय 42) असे मृताचे नाव असून, दीपक गुलाब कांबळे (वय 49, दोघे रा. आंबेडकरनगर, तडवळे, ता. कोरेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

गुलाब कांबळे यांना दोन मुले असून, दीपक थोरला, तर सुरेश धाकटा आहे. दोघांनाही दारूचे व्यसन असून, त्यांच्यात सतत भांडणे होत असत. गुरुवारी रात्री दीपक घरी आला. रागाच्या भरात चूल फुंकण्यासाठी असलेली लोखंडी फुकणी उचलून ‘सुरेशला जीवंत सोडत नाही’, असे म्हणत तो घराबाहेर पडला.

काही वेळातच त्याने सिमेंटच्या कट्टय़ावर बसलेल्या सुरेशच्या डोक्यात आणि चेहऱयावर फुंकणीने वार केले. त्यानंतर दीपक घरी येऊन वडिलांनाही शिवीगाळ करू लागला. मात्र, गुलाब कांबळे यांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे दीपक तेथून निघून गेला.

दीपकने केलेल्या हल्ल्यात सुरेश गंभीर जखमी झाला होता. त्याला नातेवाईकांनी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्याची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

 

आपली प्रतिक्रिया द्या