वाळूमाफियांची दादागिरी; पत्रकाराला दिली ट्रॅक्टर खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी

कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांचा मनमानी कारभार चालत असल्याचे चित्र आहे. वाळूमाफियांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वाळूमाफियांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याच्या घटना घडत आहे. अशातचं सुरेगाव येथाली पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळे यांना ट्रॅक्टर खाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या प्रखर विरोधानंतरही सुरेगाव गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यास व्हाईट स्टोन इंटरप्रायजेस या कंपनीला परवाना देण्यात आला. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डेपोमध्ये नियमबाह्य डुप्लिकेट पावत्यांद्वारे वाळू उपसली जात आहे. नदी पात्रात पोक्लेन, जेसीबी टिप्पर, डंपर, ट्रॅक्टर यासारखी वाहणे उतरवून तीन फुटांपेक्षा जास्त खोलीवर उत्खनन करण्यात येत आहे. गौण खणिज खरेदी दराकडून मनमानी पद्धतीने भाडे वसुल करणे, नाशिक जिल्ह्यात प्रतिबंध असताना वाळू टाकणे, रात्रीच्या सुमारास कॅमेरे बंद करुन वाहने नदी पात्रात उतरवणे, अवैधपणे वाळू उपसा करुन चढ्या भावाने नागरिकांना विकणे, व्यावसायिक वाहनांचा वापर न करणे अशा असंख्या चुकीच्या गोष्टींवर रमेश भोंगळ यांनी वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध करत आवाज उठवला होता. त्याचाच राग मनात ठेवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुरेगाव शासकीय वाळू डेपोतील मॅनेजर आनंद कदम याने पत्रकार रमेश भोंगळे यांच्या वर्कशॉफमध्ये घुसून आमच्या वाटेला गेला तर ट्रॅक्टर खाली चिरडून टाकू, अशी धमकी दिली. तसेच तुला पावत्या चेक करण्याचा काय अधिकार? तु खूप मोठा पत्रकार लागून गेला का? अशा शब्दात रमेश भोंगळे यांना दमदाटी केली.

रमेश भोंगळे यांनी सुरेगाव वाळू डेपो मॅनेजर विरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसे निवेदन तालुका पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना देण्यात आले आहे. निवेदनामध्ये आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आरोपीवर 323 आणि 506 कलमान्वये तक्रार नोंद करण्यात आली आहे.