जालन्यात आकाशातून पडले कोरियन बनावटीचे शास्त्रीय उपकरण, ग्रामस्थांमध्ये उडाली खळबळ

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहिफळ खंडारे येथे शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता एक कोरियन बनावटीचे शास्त्रीय उपकरण पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी तात्काळ तहसीलदार यांना पाठवून तपासणी केली असता ते हवामान विषयक उपकरण असल्याचे आढळून आले.

मंठा तालुक्यातील दहिफळ खंडाळे येथे शनिवारी एक शास्त्रीय उपकरण आकाशातून पडले. उपकरण हवेतून पडलेले दिसल्यामुळे ग्रामस्थही भयभीत झाले. विविध प्रकारच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली. प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सूत्रे हलवून मंठा तहसीलदार यांना सदरील यंत्राची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी या उपकरणाची तपासणी केली असता त्यावर विचित्र लिपीत काहीतरी लिहिलेले आढळून आले. त्यांनी भाषा अभ्यासकांना विचारणा केली असता सदरील भाषा कोरियन असल्याचे आढळून आले. सदरील उपकरण हे कोरियन शास्त्रीय उपकरण असल्याचे सिध्द झाले. या उपकरणावर असलेल्या कोरियन भाषेचा अनुवाद केला असता त्यावर मार्गदर्शन : हे उपकरण कोरीया प्रजासत्तकाच्या सरकारद्वारे वापरले जाणारे उच्च उंचीचे हवामान निरीक्षण उपकरण आहे. ते पुनर्जिवीत केले जाऊ शकत नाही आणि ते धोकादायकही नाही त्यामुळे ते उचलल्यावर सामान्य कचरा म्हणून त्याची विल्हेवाट लावावी असा मजकुर लिहिलेला असल्याने ग्रामस्थांचा जिव भांडयात पडला. सदरील उपकरण पंचनामा करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले असले तरी थेट कोरियाहून दहिफळ खंडारे या गावापर्यंत या उपकरणाने कसा प्रवास केला अशी चर्चा गावकऱ्यांत होती..