सोमवारपासून ‘कौन बनेगा करोडपती’

सामना ऑनलाईन । मुंबई

‘देवीयों और सज्जनो’ म्हणत ‘कौन बनेगा करोडपती’चे दहावे पर्व घेऊन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना भेटीस येणार आहेत. येत्या 3 सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर हा शो सुरू होत आहे. ‘कब तक रोकोगे’ अशी यंदाची थीम असणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या जीवनातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपले स्वप्न साकार करण्यासाठी चिकाटीने तग धरलेला असतो. हे अभियान केबीसीच्या प्रत्येक होतकरू स्पर्धकाच्या भावनांना हात घालते. या वर्षी या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी फक्त 15 दिवसांच्या कालावधीत तब्बल 31 मिलियनपेक्षा जास्त लोकानी नोंदणी केली होती. यंदाच्या वर्षी ‘आस्क द एक्स्पर्ट’ ही लाइफलाइन पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याशिवाय या कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्यक्रमाच्या रूपरेषेत क्रीडापासून ते राजकारणापर्यंत विविध विषयांवर दृकश्राव्य प्रश्न सामील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक शुक्रवारी या कार्यक्रमात ‘केबीसी कर्मवीर’चे आयोजन होईल.